वाढलेली महागाई, भ्रष्टाचार, दहशतवाद, नक्षलवाद कमी करण्यासाठी चलनवाढ थांबवणे गरजेचे होते. पाचशे- हजाराच्या नोटा याआधीच बंद करायला हव्या होत्या. पण ‘देर आये, दुरुस्त आये’ या उक्तीनुसार केंद्रीय सरकारने उशिरा का होईना उचललेले पाऊल देशाच्या भवितव्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे होणारा त्रास सहन करण्याशिवाय पर्याय नाही’, असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ यमाजी मालकर यांनी व्यक्त केले.

मैत्री परिवारतर्फे ‘अर्थक्रांतीतून अर्थशांतीकडे’ या विषयावर यमाजी मालकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश मेहाडिया होते.

‘१९४७ साली देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. पण आर्थिक स्वातंत्र्य मिळाले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थक्रांतीचे पाच मुद्दे स्वीकारून नोटाबंदीचा निर्णय घेतला ही देशाच्या आर्थिक स्वातंत्र्याची सुरूवात आहे’, असे यमाजी मालकर यांनी सांगितले.

साखर, गहू, कोळसा, स्टील, पशुधन, दूध उत्पादन, दूरसंचार, चित्रपट निर्मिती, सुपर कम्प्युटर अशा अनेक क्षेत्रात भारत इतर देशांच्या तुलनेत आघाडीवर असून परदेशात नोकरीनिमित्ताने वास्तव्यास असलेली आपली मुले डॉलर देशात पाठवतात. मनुष्यबळ, पाणी, मुबलक सूर्यप्रकाश अशा नैसर्गिक संसाधनातही आपला देश समृद्ध आहे. पण काळ्या पैशांमुळे देश पोखरला गेला आहे. राजकारण काळ्या पैशावर चालते. श्वेत अर्थव्यवस्थेची वाढ फक्त पाच टक्के असून ब्लॅक इकॉनॉमीची वाढ प्रचंड आहे, असे ते म्हणाले.

पाचशे व हजार रुपये मूल्यांच्या नोटा अधिक आहे. परिणामी महागाई वाढत आहे. महागाई हा देखील एक प्रकारचा टॅक्स असून यामुळे सूज वाढली आहे. मोठ्या नोटा रद्द करणे हा त्यावरील एकमेव उपाय होता’ असे मालकर म्हणाले. प्रकाश मेहाडिया यांचे अध्यक्षीय भाषण झाले. प्रास्ताविक प्रा. संजय भेंडे यांनी, सूत्रसंचालन माधुरी यावलकर यांनी केले तर आभार अनिल शर्मा यांनी मानले.